नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि गंगापूर पोलिस ठाण्यात अपघात आणि मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिला अपघात उत्कर्ष नगर जवळ झाला. त्र्यंबकरोडवरील अतुल नामदेव कुमावत (२५ रा.उत्कर्ष नगर झोपडपट्टी,देवी मंदिराजवळ,मायकोगेट) हा तरूण सोमवारी (दि.२) रात्री उत्कर्ष नगरकडून शहराच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. उत्कर्ष नगर पासून काही अंतरावरच भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. सामाजीक कार्यकर्ते अक्षय धांडे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत. दुसरी घटना आडगावनाका भागात घडली. हिरावाडीतील अमोल यादव हा युवक रविवारी (दि.१) सकाळी आजारी आई प्रभादेवी बाबुराव यादव (५२ रा.विघ्नहर्ता अपा.हिरावाडी) यांना दुचाकीवर बसवून परिसरातील दवाखान्यात उपचारार्थ घेवून जात असतांना हा अपघात झाला होता. महाराष्ट्र कॉलनी भागातील नंदिनी अगरबत्ती चौकात भरधाव दुचाकी खड्यात आदळल्याने प्रभादेवी यादव या धावत्या दुचाकीवरून पडल्या होत्या. या घटनेत डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. तिसरा अपघात महामार्गावर झाला. आडगाव शिवारात राहणारे ललन गंगा यादव (३२) व उमेश लेखा यादव (४२ मुळ रा.बिहार,हल्ली दत्तमंदिर समोर आडगाव) हे दोघे परप्रांतीय मंगळवारी महामार्गावरून आडगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अमृतधाम चौकात चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या उमेश यादव यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पंकजकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चालक ललन यादव यांच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघात व मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी व हवालदार वनवे करीत आहेत.