जुने नाशिक भागात अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला; तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक भागात संगणमत करून त्रिकुटाने एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्यात मुलगा जखमी झाला याप्रकरणी कैफ अशपाक शेख (१७ रा.जिन्नतनगर,वडाळागाव) या युवकाने तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहबाज,फैजान उर्फ गोली व त्यांचा एक साथीदार अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. शेख सोमवारी रात्री जाकिर हुसेन हॉस्पिटल भागात गेला होता. सार्वजनिक शौचालयासमोरून तो पायी जात असतांना संशयित त्रिकुटाने त्याची वाट अडवित कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. यावेळी टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर, मानेवर, छातीवर व डाव्या पायाच्या मांडीवर वार करण्यात आले असून याघटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.
मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या चोरी प्रकरणी मोहम्मद समशाद ओबेद (२४ रा.हरम कलेक्शन जवळ,संजीवनगर अंबडलिंकरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद ओबेद हा तरूण गेल्या २५ डिसेंबर रोजी रात्री औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. स्लाईड वेल या कारखान्यासमोरून तो फोनवर बोलत पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत एक्स्लो पॉईंटच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.