नाशिक – जेलरोड भागात मामाकडून भाच्याच्या घराचे मोठे नुकसान करुन मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत भाचा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मामा मामीसह अन्य एका विरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन भालेराव,निलिमा भालेराव व भास्कर भालेराव अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन गिरीधर डांगळे (४२ रा.श्रीकृष्णनगर,दसक) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित रतन भालेराव व तक्रारदार डांगळे हे नात्याने मामा भाचे आहेत. गेल्या शनिवारी (दि.९) ही घटना घडली. मामी आणि डांगळे यांच्या पत्नीचा किरकोळ कारणातून शाब्दीक वाद चालू असतांना तेथे आलेल्या मामा व अन्य एकाने डांगळे दांम्पत्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी भास्कर भालेराव याने धरून ठेवत संतप्त मामाने तुम्ही येथे कसे राहतात असे म्हणून घरातील वजनदार वस्तूने आपल्या डोक्यावर मारून दुखापत केली. या घटनेत जखमी झाल्याने डांगळे दांम्पत्य रूग्णालयात उपचारार्थ गेले असता संशयितांनी घराच्या छतावर चढून दगड व विटांच्या सहाय्याने सिमेंटचे पत्रे फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस नाईक एन.एस.भोळे करीत आहेत.