नाशिक – कारखान्यातील मालापोटी मिळालेल्या रक्कम घेऊन टेम्पो चालकाने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून चालका विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मोहित (रा. बेलदारवाडी, म्हसरुळ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी वाहन मालक अंकित वासुदेव येशी (२८,रा. मखमलाबाद गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित महेश हा येशी याच्या एमएच १५ एचएच ४७५१ क्रमांकाच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहे. त्याने ६ जून रोजी नेहमीप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील जवुळके येथून कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर अमोल बर्वे यांनी महेशच्या वाहनात चार लाख ९० हजार ८८० रुपयांचा माल टाकला. त्यात सायकल मोबाइल, कपडे, भांडे, बुट व चपला असा माल होता. हा माल नाशिकमधील वेगवेगळ्या ग्राहकांकडे देऊन त्यांच्याकडून आलेले पैसे कंपनीत भरण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार सकाळी महेशने हा माल घेऊन अंकित यांची भेट घेतली व माल पोहचवून पैसे कंपनीत जमा करतो असे सांगितले. मात्र महेशने एक लाख ७४ हजार १६७ रुपयांचा माल घरात ठेवून उर्वरीत माल ग्राहकांना दिला व त्यातून आलेले तीन लाख १६ हजार ७१३ रुपये कंपनीत जमा न करता तो पसार झाला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत.