नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील त्रिमुर्तीचौकात भरधाव कारने धडक दिल्याने जेवणाची ऑर्डर घरपोहच करणा-या झोमेटो कर्मचा-याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. याबाबत कार सोडून पोबारा करणा-या कारचालकाविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर दगाजी धिवर (३० रा.लक्ष्मी अपा.शेजारी धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. धिवर झोमेटो या जेवण घरपोहच पुरविणा-या कंपनीत कार्यरत होतो. शनिवारी (दि.३१) मध्यरात्री तो सेवा बजावत असतांना हा अपघात झाला. कॉलेजरोड भागातील एका हॉटेलमधून पार्सल घेवून तो सिडकोतून पाथर्डी फाट्याच्या दिशेने ग्राहकास पोहच करण्यासाठी आपल्या दुचाकीवर जात असतांना ही दुर्घटना घडली. त्रिमुर्तीचौकात भरधाव एमएच १५ जीएल ०६८५ या कारने दुचाकीस धडक दिली. त्यात धिवर हा दुभाजकावर फेकला गेला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कारचालकाने आपले वाहन सोडून पोबारा केला असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. धिवर याच्या पश्चात आई,पत्नी व लहान मुले असा परिवार असून तो घरातील एकमेव कर्तापुरूष असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कार सोडून पोबारा करणाºया चालकावर पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.