नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक कार्यक्रमात स्वयंपाक करण्यासाठी लागणारी तब्बल पावणे दोन लाखाची भांडी भामट्याने लंपास केले आहे. विकासकुमार खन्ना (रा.खुरला जालंधर,पंजाब) असे भांडी पळविणा-या भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी भांडी भाडेतत्वावर देणारे मोबीन सुलेमान अत्तार (रा.रॉयल कॉलनी,पखालरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्तार यांचा स्वयंपाकासाठी भांडे पुरविण्याचा वडिलोपार्जीत व्यवसाय आहे. गेल्या बुधवारी (दि.२८) संशयित पंजाबच्या दानशुराने अत्तार यांची भेट घेतली होती. गंजमाळ येथील रॉयल हेरिटेज येथे खन्ना कुटुंबिय थांबल्याचे सांगत संशयिताने गोदाघाटावरील रामकुंड भागात अन्नदान करावयाचे असल्याची बतावणी केली होती. यानुसार रितसर भाडेतत्वाची पावती फाडण्यात आल्याने अत्तार यांनी हॉटेल रॉयल हेरिटेज येथे भांडी पोहचविले होते. त्यात अल्युमिनीअमचे १८ मोठे पातीले,१२ लोखंडी झाकणे, गॅस शेगडी, गॅलोनाईज धातुचे आठ ट्रे आदी भांड्याचा समावेश होता. दोन दिवस उलटूनही खान यांनी भांडे पोहच न केल्याने तसेच सर्वत्र शोधशोध करूनही ते मिळून न आल्याने अत्तार यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.