नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शितळा देवी मंदिर परिसरात मोटरसायकल व्यवस्थीत दुरूस्त केली नाही या कारणातून त्रिकुटाने एका गॅरेजचालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने धारदार वस्तूने डोक्यात मारल्याने गॅरेज चालक जखमी झाला आहे. या मारहाणीची तक्रार नुतनकुमार वसंतराव जाधव (२७ रा.काझीगडी) या युवकाने केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाण प्रकरणात दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद जाहिद कदीर खान (२०),ऋतीक बाळासाहेब डोंगरे (१९ रा. दोघे शितळा देवी मंदिराजवळ,अमरधाम रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून धनंजय चौधरी नामक त्यांचा साथीदार अद्याप फरार आहे. जाधव यांचे शितळा देवी मंदिर परिसरात दुचाकी दुरूस्तीचे टाळकुटेश्वर नावाचे गॅरेज आहे. गेल्या मंगळवारी (दि.२०) रात्री ही घटना घडली. संशयित चौधरी याने आपली दुचाकी जाधव यांच्या गॅरेजवर दुरूस्तीसाठी लावली होती. मगळवारी रात्री संशयिताने दुचाकी व्यवस्थीत दुरूस्त केली नाही या कारणातून वाद घातला यावेळी त्रिकुटाने शिवीगाळ करीत जाधव यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्यांच्या डोक्यात धारदार वस्तूने घाव घातल्याने जाधव जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.