नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीतगावातील वालदेवीनगर भागात जीवे मारण्याची धमकी देत दोघांनी तरूणाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुकलीने तरूणाची पल्सर दुचाकी पेटवून दिली असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीलुटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की शिराळ व त्याचा एक साथीदार अशी लुटमार करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण जगन्नाथ धोंगडे (रा.विटभट्टीरोड वालदेवीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. धोंगडे मंगळवारी (दि.२७) रात्री विटभट्टी रोडने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. संशयितांनी धोंगडे यांची वाट अडवित शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत धोंगडे यांच्या खिशातील ३०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यानंतर धोंगडे यांनी कशीबशी सुटका करून घेत आपले घर गाठले असता संशयितांनी घरासमोर येवून पार्क केलेली त्यांची पल्सर एमएच १५ एचबी ६४७० पेटवून दिली. या घटनेत मोटरसायकले मोठे नुकसान झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत.