नाशिक – चार कोटीच्या विम्यासाठी देवळाली परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव याचा मित्रांनीच खून करत अपघाताचा बनाव केल्याची घटना काही दिवसापूर्वी उघड झाली होती. आता या खून प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भालेराव यांचा खून करण्याच्या जवळपास ८ महिन्यांपूर्वी याच घटनेतील काही संशयित आरोपींनी २६ जानेवारी २०२१ ला मध्यरात्री गोदावरी किनारी बसलेल्या एका अनोळखी इसमाला दारू पाजून खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आता म्हसरूळ पोलीस ठाण्यात अशोकच्याच खुनाच्या घटनेतील आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींमध्ये मयत अशोक भालेराव यांचे नाव आल्याने या घटनेचे गुढ वाढले आहे.
याबाबत समजलेली माहिती असी की, गोदावरी किनारी बसलेल्या एका अनोळखी इसमाला दारू पाजून या आरोपींनी त्याला स्कॉर्पिओ गाडीत बसवून आडगाव म्हसरुळ लिंक रोडवर फेकून दिले. त्यानंतर त्याच्या अंगावरुन गाडी चालवली. हा अपघात असल्याचे सर्व चित्र नंतर निर्माण केले. त्यामुळे म्हसरूळ पोलीस ठाण्यात तेव्हा अपघाताचा गुन्हाही दाखल झाला होता. आता हा अपघात नसून तो खून होता हे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही घटनेचा आता कसून तपास सुरु केला आहे.
काय आहे विमा प्रकरण
दोन आठवड्यापूर्वी चार कोटी रुपयांचा विमा हडपण्यासाठी देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या अशोक भालेराव यांचा २ सप्टेंबर २०२१ ला त्याच्याच ६ साथीदारांनी मारहाण तसेच अंगावर गाडी खालून खून करत अपघाताचा बनाव केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे त्याच्या नावावरील ४ कोटींच्या विम्याचे पैसेही काढून घेण्यात आल्याचेही उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणाच्या पोलिस सखोल तपपास करत असतांना आणखी एका खूनाचा प्रकार समोर आला आहे.