नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत कारखान्यात काम करणा-या परप्रांतीय दोघा चुलत भावांना बेदम मारहाण करीत एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुंजबिहारी गोवर्धन शर्मा (मुळ रा. बिहार हल्ली महालक्ष्मीनगर,अंबड) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण चव्हाण असे दोघा भावांना मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. या घटनेत रविशंकर कृपाशंकर विश्वकर्मा (२१ रा.महालक्ष्मीनगर) हा युवक जखमी झाला आहे. शर्मा व विश्वकर्मा एकमेकांचे चुलत भाऊ असून ते अंबड औद्योगीक वसाहतीतील नेक्टर किचन ट्रॉली या कारखान्यात काम करतात. रविवारी (दि.२५) सायंकाळी दोघे भाऊ नेहमी प्रमाणे कारखान्यात काम करीत असतांना संशयितांना त्यांना बाहेर बोलावून घेत जखमी विश्वकर्मा यास मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केली. यावेळी शर्मा यांनी संशयितास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही संशयिताने शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संतप्त संशयिताने विश्वकर्मा यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून जखमी केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.