नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील बोधलेनगर सिग्नल भागात दुचाकीवरून पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर दोन दिवस त्यांच्यावर मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. पुष्पा संभाजी शिंदे (४५ रा.प्रभूनगर,सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे या बाहेरगावी गेल्या होत्या. रविवारी (दि.२५) त्या रेल्वे प्रवास करून नाशिकरोड येथे आल्या होत्या. मुलाच्या दुचाकीवर डबलसिट बसून त्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. नाशिकरोड येथून मायलेक सातपूरच्या दिशेने प्रवास करीत असतांना बोधलेनगर सिग्नल भागातील क्रोमा शोरूम समोर रस्त्यावरील खड्यामुळे त्या धावत्या दुचाकीवरून पडल्या होत्या. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मुलगा प्रदिप शिंदे यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील वसंत पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. गेली दोन दिवस त्या मृत्यूशी झुंज देत असतांना मंगळवारी डॉ. तृप्ती हिवाळे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार एन.एन.शेख करीत आहेत.