दुचाकी झाडावर आदळल्याने ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू
नाशिक : आर्टिलरी सेंटर गेट भागात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ३५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मिस्त्रीलाल नेकाजी चौधरी (३५ रा.विजयलक्ष्मी अपा.पाथर्डी फाटा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौधरी शनिवारी रात्री नारायणबापूनगर कडून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. दुचाकीवर प्रवास करीत असतांना उपनगर नाका भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर त्यांची दुचाकी आदळली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चौधरी गंभीर जखमी झाले होते. अज्ञात वाहनचालकाने त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
४१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यु
नाशिक : मखमलाबाद येथील शांतिनगर भागात पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुषार देवराम तिदमे (रा.स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळ,शांतीनगर) असे मृत इसमाचे नाव आहे. तिदमे गेल्या १ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्रा समोरून आपल्या घराकडे पायी जात असतांना अचानक पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या नामको चॅरिटेबल ट्रस्ट रूग्णालयात दाखल केले होते. गुरूवारी (दि.७) रात्री अचानक त्यांची प्रकृर्ती खालवल्याने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.