नाशिक – मुंबईच्या प्रवाश्याच्या बँकखात्यातील ९० हजार रूपये परस्पर काढून घेतले. वीज कट करण्याचा बहाणा करून ही फसवणूक करण्यात आली. रविकांत कमलाकर काळे (रा.मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे २२ मे रोजी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. नाशिकरोड येथील रेल्वेस्टेशन येथे परतीच्या प्रवासासाठी बसमधून प्रवास करीत असतांना हा प्रकार घडला. व्दारका भागात त्यांच्या मोबाईलवर वीज बिल थकित असल्याबाबत संदेश आला. या संदेशात तात्काळ संपर्क न साधल्यास वीज कट करण्याचे नमुद करण्यात आल्याने काळे यांनी दीपक शर्मा नामक इसमाच्या ६२९५८४१२२८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता ही फसवणुक झाली. भामट्यांनी टिम व्हयुअर व क्वीक सपोर्ट नावाचे मोबाईलमध्ये अॅप डाऊन लोड करण्यास भाग पाडले. या अॅपद्वारे क्रेडिट कार्ड वरून काळे यांनी वीज बिल अदा केले असता त्यांच्या बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवित भामट्यांनी ९० हजार ३३८ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. काळे यांनी मुंबई रेल्वे पोलिसांशी संपर्क साधल्याने हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग झाला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.