नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंगाडा तलाव येथे कारचा दरवाजा उघडून मागील सीटवर ठेवलेल्या बॅगेतून पावणेआठ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या चोरी प्रकरणी देवीसिंग जिवाराम पुरोहित (रा. ग्रील्स रेसिडेन्सी, आनंदवल्ली, नाशिक) यांनी तक्रार दिली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी जात असतांना पुरोहीत यांच्या ह्युंडाई कंपनीच्या क्रेटा कारचे शिंगाडा तलाव परिसरातील युनिक मोटार्स दुकानासमोर पुढील चाक पंक्चर झाले. त्यानंतर पुरोहित व त्यांचे दाजी कृष्णा पुरोहित हे दोघे जण कारच्या मागे असलेल्या डिक्कीतून स्टेपनी काढून टायर बदलत होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा उघडून मागील सीटवर ठेवलेल्या बॅगेमधून ७ लाख ७० हजार ४०० रुपयांची रोख रक्कम व ३ हजार रुपये किमतीचा अॅपल मोबाईल अॅडॉप्टर असा एकूण ७ लाख ७३ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या चोरीचा पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करीत आहेत.