नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार करुन नग्न अवस्थेत फोटो काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसा स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला कामावर असताना संशयित आरोपी याने तिला एका चिठ्ठीवर त्याचा मोबाईल नंबर लिहून दिला आणि तू मला फोन कर असे सांगितले. याबरोबरच फोन केला नाही तर मी तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने आरोपीस फोन केला. तेव्हा फोनवरुनच संशयिताने या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. यावेळी नकार दिला तर पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर तो ही मागणी वारंवार करत होता. पण, त्यानंतर त्याने थेट महिलेचे घर गाठले व तिला धमकावून बलात्कारा केला. यावेळी तिचे नग्न अवस्थेत फोटो काढले व घडलेल्या या प्रकाराची माहिती कोणाला दिली तर पतीला जीवे मारेल अशी धमकी देत तो निघून गेला. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी संशयित आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.