नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने चारचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना जेलरोड परिसरातील नारायण बापू नगर येथे आज पहाटे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आपली दहशत निर्माण व्हावी म्हणून गाड्यांची तोडफोड या टोळक्याने केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाली आहे. ही तोडफोड झाल्यानंतर येथील स्थानिक जमा झाले. त्यांनी संताप व्यक्त करुन संबधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.