नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात भरदिवसा गुरुवारी झालेल्या दोन घरफोडीमध्ये चोरट्यांनी अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आडगाव आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना दसक शिवारात घडली. शोभा श्याम कदम (रा.गजलक्ष्मी अपा.महालक्ष्मीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम या गुरूवारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याची पोत, कानातले व चार अंगठ्या असा सुमारे १ लाख ४५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत. दुसरी घटना महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात घडली. येथे राहणा-या जोत्सना सुनिल कदम (रा.मारूती मंदिरा पाठीमागे,स्वामी समर्थ नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कदम कुटुंबिय गुरूवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १९ हजार ५०० रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.