नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पखालरोड भागात घरमालकाकडे चौघांनी सदनिकाचा ताबा पाहिजे असल्यास दहा लाखाची खंडणी मागितली. या संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या चौघांनी बळजबरीने घरात प्रवेश करीत घरमालकास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी अझहर रफी सय्यद (रा.हरी पाम्स अपा.शिखर सोसा.समोर भाभानगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समिर काझी, अस्लम कुरेशी व दोन अनोळखी महिला अशी संशयितांची नावे आहेत. सय्यद यांचा पखालरोडवरील उस्मानिया चौकात असलेल्या आकाशदर्शन सोसायटीत सदनिका आहे. गेल्या २१ जुलै रोजी रात्री सैय्यद हे आपल्या वडिलांना सोबत घेवून फ्लॅटमध्ये न्यायालयीन कागदपत्र ठेवण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती.
बापलेकाने आपला बंद फ्लॅट उघडून घरात प्रवेश केला असता संशयितांनी पाठोपाठ बळजबरीने घरात शिरले. यावेळी संशयितांनी या सदनिकेचा ताबा पाहिजे असल्यास सय्यद यांच्याकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी केली. सय्यद यांनी संशयितांना खंडणी का देवू असे सुनावले असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.