नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनोळखी मोबाईल फोन नंबरवरुन आलेली लिंक ओपन करताच बँक खात्यातील तब्बल ९० हजाराची रोकडवर भामट्याने ऑनलाईन डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या फसवणूक प्रकरणी योगेश गिरीराज जाधव (रा.सुयश अपा.तिडके कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव यांच्या व्हॉटसअप या सोशल साईटवर गेल्या मंगळवारी (दि.६) दुपारच्या सुमारास ९१६२९४०९२५१३ या अनोळखी क्रमांकावरून एक लिंक पाठविण्यात आली होती. जाधव यांनी कुतूहलापोटी ती ओपन केली असता ही घटना घडली. टुडे डिलीव्हरी या नावाच्या अॅपची लिंक ओपन करताच जाधव यांच्या एचडीएफसी बँक खात्यातील अनुक्रमे ५० व ४० अशी ९० हजाराची रोकड सायबर भामट्यांनी ऑनलाईन लांबविली. जाधव यांनी बँकेत चौकशी करून पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत आहिरे करीत आहेत. दरम्यान आधुनिक युगात सोशल मिडीया हाताळतांना नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.