नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डीगावात शिवीगाळ करण्यास मनाई केल्याने एकाने दगडफेक करीत दुकानदार महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत महिला जखमी झाली असून दुकनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश समाधान शेजूळ (२० रा.मधुकरनगर,राजवाडा पाथर्डीगाव) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे. पीडितेचे पाथर्डीगावात किरणा दुकान असून, ती गुरूवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. दुकानासमोर आलेला संशयित सोबत असलेल्या मित्रास शिवीगाळ करीत होता. यावेळी महिलेने येथे शिवीगाळ करू नको असे टोकल्याने ही घटना घडली. संतप्त झालेल्या संशयिताने महिलेस व तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. यावेळी संशयिताने थांब तुझ्याकडे बघतोच असे म्हणत दुकानावर दगडफेक केली. या दगडफेकीत पीडितेच्या डाव्या खांद्यास दुखापत झाली असून, दुकानातील सामानाचेही नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.