गोदावरी पात्रात पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी पात्रात पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. बेबीलाल नारायण पवार (रा.विठ्ठल रूख्मिनी मंदिर, गोदावरी हाईट बिल्डींग समोर,शिवाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवार यांचा मृतदेह गुरूवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास सोमेश्वर धबधबा भागात आढळून आला. पाण्यावर मृतदेह असल्याचे निदर्शनास येताच फायर ब्रिगेडच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. जीवरक्षक आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर सदर व्यक्तीची ओळख पटली असून, पाण्यात पडल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
कांबळेवाडीत ४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांबळेवाडीत राहणा-या ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदाशिव चंदर बामणे (रा.कांबळेवाडी,सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बामणे यांनी गुरूवारी (दि.१५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी बल्लीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. पत्नी मंदाबाई बामणे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.