नांदगाव – मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार नांदगाव तालुक्यातील येथे घडली. हत्येची सुपारी घेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या जनार्दन अप्पा पेंढारे (४५) याची आई जन्याबाई पेंढारे यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हत्येची सुपारी घेणारा संशयित समाधान दौलत भड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत जन्याबाई यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार मुलाला फिट येत असल्याने व मुलगा मनोरुग्ण असल्याने गावात राहणाऱ्या समाधान भड याला मुलाला मारण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले.
ठरल्याप्रमाणे भड याने गुरुवारी दुपारी मुलगा जनार्दन याच्या डोक्यात पहारीने घाव घालत ठार मारले. मृतदेह
प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून साईनाथ राठोड यांच्या शेतात फेकून दिला. घटनेची माहिती समजल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपविभागीय अधिकारी समिरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक सुरवडकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, सागर कुमावत, भारत कांदळकर करत आहे.