महामार्गावरील भागात घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवज लंपास केले. यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. ही घरफोडी महामार्गावरील इच्छामणी भागात झाली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशनी प्रशांत बारी (रा.सरगम रो हाऊस,इच्छामणी नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बारी कुटूंबिय दि.४ ते ८ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या बॅगेतून २० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे दीड लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.
नैराश्यातून दोन आत्महत्या
नाशिक : शहरात वेगवेगळया नैराश्यातून अबालवृध्दांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असून, सिडकोतील ६९ वर्षीय वृध्दासह चांदगिरी ता.जि.नाशिक येथील ६७ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील दिलीप प्रल्हाद माळवे (रा.सदगुरू निकेतन अपा.सदगुरू नगर) यांनी शुक्रवारी (दि.८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्याना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक लहाणे करीत आहेत. दुसरी घटना चांदगिरी ता.जि.नाशिक येथे घडली. भागिरथी अर्जुन कटाळे या महिलेने गेल्या २७ जून रोजी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता शुक्रवारी (दि.८) उपचार सुरू असतांना डॉ. राकेश पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.