नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमाननगर भागात गार्डन मध्ये सीसीटिव्ही कॅमेरा बसविला नाही या कारणातून तीन जणांच्या टोळक्याने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. चैतन्य निकम व त्याचे दोन साथीदार अशी चाकू हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मदन खंडेराव शिंदे (३४ रा.मुनिंदर हाईटस,हनुमाननगर) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे शुक्रवारी परिसरातील हनुमाननगर मंदिर गार्डन येथे गेले होते. संशयित टोळक्याने त्यांना गाठून तू गार्डन मध्ये सीसीटिव्ही कॅमेरा का बसविला नाही. या कारणातून कुरापत काढून टोळक्याने शिंदे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी टोळक्याने तुझा बेत पाहू अशी धमकी देत एकाने धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला दुखापत झाली असून अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.