भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ६९ वर्षीय वृध्द गंभीर जखमी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील मुंबईनाका सर्कल भागात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६९ वर्षीय वृध्द गंभीर जखमी झाले. सुधाकर राजाराम बने (रा.राजरत्ननगर,सिडको) असे जखमी वृध्दाचे नाव आहे. बने गेल्या शुक्रवारी (दि.९) मुंबईनाका सर्कल भागातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. भरधाव आलेल्या एमएच १५ सीसी ७४८३ या दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात बने गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जखमीच्या मुलाने पोलिसात धाव घेतली असून सुजीत बने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.
४७ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४७ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली. अनिल बाबूराव मोरे (रा.जयगणेश सोसा.जवळ इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मोरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोरे यांनी रविवारी (दि.११) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास कापडी स्टोल बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मनोज मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार उगले करीत आहेत.