नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वाहनांच्या धडकेत दोन जण ठार झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला अपघात जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ झाला. नांदूर नाक्याकडून बिटकोकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत विजय साबळे (४५ रा, नंदनवन रो हाऊस टाकळी रोड, जेल रोड, नाशिकरोड) हे ठार झाले. साबळे हे आपल्या दुचाकी गाडीवरून जेलरोड कॅनॉल मार्गे जात होते. याच दरम्यान त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली त्यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकाचा शोध घेतला असून पोलिसांना गाडीचा नंबर व वाहन चालक याबाबत माहिती मिळाली आहे. या घटनेप्रमाणे नाशिकरोड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरा अपघात उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वडनेर पाथर्डी रस्त्यावर सैनिक कॉलनी परफेक्ट गॅरेज जवळ झाला. एका चार चाकी वाहनाच्या धडकेत दयाल विशनदास पर्यानी (६१) हे ठार झाले पर्यानी हे आपल्या प्लेजर स्कूटर वरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना वडनेर पाथर्डी रस्त्यावर धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. सदर घटने प्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञात वाहन धारका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.