नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -रिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्स मध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४६ हजाराचा ऐवज होता. सह प्रवासी असलेल्या एका महिलेनी पर्स चोरल्याचा अंदाज असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला विनायक भावसार (रा.पवननगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भावसार या गुरूवारी (दि.८) ठक्कर बाजार परिसरात आल्या होत्या. जिल्हा रूग्णालया समोरून त्या घरी जाण्यासाठी प्रवासी रिक्षात बसल्या असता ही घटना घडली. रिक्षात एक महिला प्रवासी होती. दोन्ही महिला प्रवास करीत असतांना भामट्या महिलेने भावसार यांच्या पर्सवर डल्ला मारला. त्रिमुर्ती चौक भागात सदर महिला रिक्षातून उतरून गेली असता ही घटना उघडकीस आली. पर्समध्ये १ हजार २०० रूपयांची रोकड व सोन्याचे मंगळसुत्र असा सुमारे ४६ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.