नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रेडीट कार्डच्या माध्यमातून डिजीटल गोल्ड खरेदी करुन महिलेची १ लाख ३४ हजाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी या कार्डचा वापर केला. गौरी गिरीश कुलकर्णी (रा.अश्विननगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलकर्णी यांनी बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वेचे रिझर्व्हेशन केले होते. ऐनवेळी बाहेरगावी जाणे रद्द झाल्याने त्यांनी तिकीटाचे पैसे परत रिफंड मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी केली होती. त्यानुसार गेल्या ५ नोव्हेंबर रोजी भामट्यांनी कुलकर्णी यांचा मोबाईल नंबर मिळवित संपर्क साधला होता. ७९९३९५४४७० या क्रमांकावरून संपर्क साधणा-या भामट्याने त्यांना रेल यात्री मधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या बॅक खात्याची आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळविली. त्यानंतर संबधिताने कुलकर्णी यांच्या क्रेडिट कार्डचा परस्पर वापर करून सुमारे १ लाख ३४ हजार ९९८ रूपये किमतीचे डिजीटल गोल्ड खरेदी करून ते दुस-या व्यक्तीस विक्री केले. ही फसवणुक अॅमेझोन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक नंदन बगाडे करीत आहेत.