नाशिक- घंटागाडी कर्मचाऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी तीन सुपरवायझर विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जतीन दाणी (४५, रा. पंचवटी), रमीज मनियार (३८, रा. जुने नाशिक) व सुमीत कोष्टी (३२, रा. सिडको) अशी सुपरवायझर नावे आहेत.
किरण माणिक पुराणे या घंटागाडी कर्मचाऱ्याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी किरणने व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवून सुपरवायझरने कसा त्रास दिला ही पोस्ट केली होती. त्यावरून किरणचा भाऊ अरुण पुराणे (३२) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणच्या फिर्यादीनुसार संशयितांनी संगनमत करून १० मार्च पासून किरणचा छळ केला. वारंवार पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास कामावर न घेणे, पगार झाल्यावर पार्टीची मागणी करणे, त्याचप्रमाणे जादा काम देत शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने किरणने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.