नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिमंडळ १ उपायुक्तांनी स्थापन केलेल्या अॅण्टी मोटारसायकल थेप्ट पथकाने घरफोड्या आणि मोटारसायकल चोरी करणा-या दोन चोरांना गजाआड केले आहे. या चोरांकडून अडीज लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरांच्या अटकेमुळे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू उकांडा ठोके (४० मुळ रा. अंजनी ता.मेहकर जि.बुलढाणा हल्ली फिरस्ता गंगाघाट,) व अब्दूल सलीम शेख (रा.म्हाडा बिल्डींग वडाळागाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. ठोके घरफोड्या करण्यात तरबेज असून शेख हा मोटारसायकल चोर आहे. परिमंडळ १ चे अॅण्टी मोटारसायकल थेप्ट पथकाचे संतोष पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.५) पथकाने एनडी पटेल रोड भागात सापळा लावला असता ठोके पोलिसांच्या हाती लागला. संशयिताच्या पाठीला लावलेल्या बॅगेची पथकाने तपासणी केली असता त्यात वेगवेगळया कंपनीचे १५ मोबाईल व एक टॅब आढळून आला. पोलिस तपासात त्याने भद्रकालीत एक व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली.
संशयिताच्या ताब्यातून घरफोडीतील सोन्याच्या दागिण्यांसह पंधरा मोबाईल व एक ट्रब हस्तगत करण्यात आला आहे. दुसरी कारवाई डॉ.जाकिर हुसेन हॉस्पिटल भागात करण्यात आली. विना नंबर दुचाकीवर प्रवास करणा-या शेख याच्या चौकशीत त्याने ताब्यातील काळया रंगाची पल्सर ही सिडकोतील उत्तमनगर भागातून चोरी केल्याची कबुली दिली. दोघा संशयितांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांच्या अटकेने अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे,शिपाई अनिल आव्हाड,इरफान शेख,संदिप रसाळ,शिवाजी मुंजाळ,गोरक्ष साबळे व चालक सुर्यवंशी आदींच्या पथकाने केली.









