नाशिक : बनावट कागदपत्राच्या आधारे जातीच्या दाखला बनवल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजपूत इश्वरसिंग गुलाबसिंग उर्फ इश्वर गुलाब वाघ (५०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विनायक जाधव (रा.जयभवानीनगर,टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयिताने आघार बु.विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत या संस्थेच्या पंच वार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतांना सहाय्यक जिल्हाधिकारी निलेश श्रींगि यांची डिजीटल साक्षरी व बारकोड असलेला राजपूत भामटा या (ए) प्रवर्गातील जातीचा दाखला सादर केला आहे. चौकशीअंती हा दाखला बोगस असल्याचे समोर आले असून संशयिताने संगणकाचा वापर करून बनावट कागदपत्राच्या आधारे आॅनलाईन पध्दतीने हा दाखला तयार केल्याचे व मिळविल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.