नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शनिवारी रात्री आडगाव शिवारात तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिरावाडीतील गायत्री अविनाश बस्ते (रा.भावबंद सोसा.रेशीमबंध लॉन्स शेजारी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बस्ते कुटुंबिय शनिवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड,सोन्याचांदीचे दागिणे आणि इंटेल कंपनीचा सीपीयू असा सुमारे १ लाख ९२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत. दुसरी घटना कैलासनगर भागात घडली. भरत बारकू फड (रा.ब्लासो हाईटस,रामाजनेय मंदिर,यमुना प्राईडच्या समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. फड व त्याच्या इमारतीत राहणारे राजेश लाटे यांच्या बंद घराचे चोरट्यांनी कुलूप व सेफ्टी डोअर तोडून कपाटातील १ लाख ३० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे व टिव्ही असा सुमारे १ लाख ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.