आयटीआय सिग्नलला भागात पार्क केलेल्या कारची काच चोरट्यांनी फोडली; लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्र केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल भागात पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्र चोरून नेली. निलेश वसंत येवला (रा.पारिजातनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला शनिवारी रात्री आयटीआय सिग्नल भागात गेले होते. शिमला फरसाण दुकानासमोर त्यांनी आपली कार एमएच १५ एचजी ६४५८ पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून पाठीमागील सिटावर ठेवलेली सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप आणि चाव्या चोरून नेल्या. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
अमृतधाम भागात राहणा-या ५१ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात राहणा-या ५१ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सतिश दत्तात्रेय देसले (रा.सोनाली पार्क,हनुमाननगर) असे मृत इसमाचे नाव आहे. देसले यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देसले यांनी रविवारी (दि.४) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भुषण कापडणीस यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.