नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सौभाग्य नगर भागात कारची धडक देत टोळक्याने कोयत्याने दुचाकीस्वारांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृर्ती गंभीर आहे. याप्रकरणी श्री उर्फ मोनू संजय वर्मा (२७ रा.म.गांधी रोड,देवळाली गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांच्या टोळक्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळा जाधव, दिनेश जाधव,मयुर बिडवे व अन्य एक अनोळखी अशी दोघा मित्रांवर जीव घेणा हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. मोनू वर्मा आणि समिर उर्फ मुस्तफा सलीम पठाण हे दोघे मित्र शनिवारी (दि.३) रात्री नाशिकरोड येथील वास्को चौकातून दुचाकीला पेट्रोल भरण्यासाठी सौभाग्यनगर भागात गेले होते. पेट्रोल भरून ते देवळाली कॅम्पच्या दिशेने जाण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकांमधील पंचर मध्ये उभे असतांना ही घटना घडली. समोरील मार्गावर रहदारीमुळे दोघे मित्र आपल्या वाहनासह थांबलेले असतांना वळण घेण्यापूर्वीच नाशिकरोड कडून भरधाव आलेल्या अल्टो कारने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या घटनेत दोघे मित्र रस्त्यावर पडले असता कारमधून खाली उतरलेल्या चार जणांच्या टोळक्याने समीरला मारून टाका असे म्हणत कोयत्याने हल्ला केला. शिवीगाळ करीत या टोळक्याने समिर पठाण याच्या डोक्यात तोंडावर, छातीवर आणि हातावर सपासप कोयत्याने वार केले. यावेळी त्याच्या मदतील वर्मा धावून गेला असता संशयितांनी त्यास कोयता उलटा करून बेदम मारहाण केली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे बोलले जात असून जखमी दोघा मित्रांवर सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत.