नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीरोड वरील लाटेनगर भागात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या वादातून परिसरातील नागरीकांनी मायलेकींना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पहिल्या गुन्हयातत मायलेकींचा तर दुस-या गुन्हयात तब्बल बारा महिला व पुरूषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील महिलेस कुत्र्याने चावा घेतल्याने ही घटना घडली असून यात दोघा महिलांना जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, लाटेनगर भागात राहणा-या एका महिलेवर बुधवारी मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत चावा घेतला. यातून ही घटना घडली असून, मायलेकी कुत्र्यांना खाऊ पिऊ घालत असल्याने कुत्र्याचा सुळसुळाट झाल्याचा आरोप परिसरातील नागरीकांनी केला आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास परिसरातील दहा ते बारा नागरीक एकत्र जमत मायलेकी राहत असलेल्या बिल्डींगमध्ये गेले होते. जमावाने बिल्डींगच्या पार्किंगमध्ये बोलावून घेत मायलेकींना तुम्ही परिसरातील कुत्र्यांना खावू पिऊ घालत असल्याने ते नागरीकांना चावा घेत असल्याचा आरोप करीत महिलांना जाब विचारत जमावाने गोंधळ घातला.
यावेळी मुलीने मोबाईलवर व्हिडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता संशयित टोळक्याने मायलेकींना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रसंगी संतप्त जमावाने जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देत महिलांचा विनयभंग केला आहे. या घटनेत मायलेकींचे मोबाईल हिसकावून घेत फोडून टाकण्यात आले. तर या भागातील सीसीटिव्ही यंत्रणेचेही नुकसान करण्यात आले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक गोसावी आणि सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.