नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संजयनगर भागात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून परिचीताने एकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत सदर इसमाच्या डोळयाच्या भुवईवर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चांद गुलाब सय्यद (रा. साई कोठी बिल्डींग, वडाळा पाथर्डीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू गटकळ असे संशयिताचे नाव आहे. सय्यद गेल्या बुधवारी (दि.३०) मित्रास हात उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी संजयनगर भागात गेले होते. पाण्याच्या टाकीजवळून ते जात असतांना त्यांना मद्याच्या नशेत असलेल्या परिचीत संशयिताने गाठले. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली असता सय्यद यांनी नकार दिल्याने ही घटना घडली. संशयिताने खिशातील धारदार वस्तूने त्यांच्या तोंडावर हल्ला केला. या घटनेत सय्यद यांच्या डोळ्याच्या भुवईवर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.