नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोपडा लॉन्स जवळ मी इथला भाई आहे अशी बतावणी करुन पोटास चाकू लावत दुचाकी अडवून चोरट्याने पाच हजार खिशातून काढून पळ काढला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरि विठोबा गुडनर (रा.क्रांतीनगर,मखमलाबादरोड) यानी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुडनर बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास शिकवणीसाठी गेलेल्या मुलास घेण्यासाठी गंगापूररोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच ०४ जीएक्स ०९१०) जात असतांना ही लुटमारीची घटना घडली. चोपडा लॉन्स भागातील कोशिरे मळा परिसरातून ते दुचाकीवर प्रवास करीत असतांना मोटारसायकलवर आलेल्या भामट्याने त्यांची दुचाकी अडविली. यावेळी संशयिताने थेट गुडनर यांच्या पोटास चाकू लावत मी इथला भाई आहे. पोलिसात तक्रार दिली तर जीवे ठार मारेल अशी धमकी देत संशयिताने त्यांच्या खिशातील ५ हजार २० रूपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.