नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात भरदिवसा झालेल्या दोन घरफोडीमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पहिली घरफोडी आडगाव शिवारात झाली. म्हाडा सोसायटीत राहणारे सुनिता भास्कर सोनवणे (रा.न्यु इग्लिश शाळेजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे कुटूंबिय गुरूवारी (दि.१) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी डोअर तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली तीन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ९५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत. दुसरी घटना सातपूर येथील महादेववाडी भागात घडली. विजया जिभाऊ धिवरे (रा.मराठी शाळे मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धिवरे कुटूंबिय बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ७१ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.