नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साखरेची परस्पर विक्री करून एकाने व्यापा-यास तब्बल साडे अकरा लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साखर व्यापारी लेहरचंद रतिलाल लोढया (रा.बळी मंदिरा शेजारी,पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन लक्ष्मण भोजवाणी (रा.मालधक्कारोड,सुभाषरोड ना.रोड) असे व्यापा-यासह गंडविणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी साखर व्यापारी लेहरचंद रतिलाल लोढया (रा.बळी मंदिरा शेजारी,पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लोढया आणि संशयित भोजवाणी साखर विक्री करणारे होलसेल व्यापारी असून त्यांच्या माध्यमातून शहरासह ग्रामिण भागात साखर वितरीत होते. लोढया यांची औरंगाबाद रोडवरील चौधरी यात्रा भागात दिप ट्रेंडर्स नावाची फर्म असून तेथेच गोडावून आहे. तर संशयित दिपेश ट्रेंडिग कंपनीच्या नावाने आपला व्यवसाय सांभाळतो. सन.२०१८ मध्ये दोघा व्यापा-यांमध्ये साखर खरेदी बाबत व्यवहार झाला होता. त्यामुळे लोढया यांनी सहकार महर्षी बाळासाहेब थोरात सह.साखर कारखाना अमृतनगर,संगमेनर व प्रवरा सह.साखर कारखाना अहमदनगर या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात साखरचा साठा उचलला होता. हा साठा एमएच १५ बीजे ८१९८,एमएच १५ सीके १६९७ व एमएच १५ जीव्ही ७६८६ या भाडेतत्वावरील मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक करण्यात आला होता. त्यातील २२ मे रोजी लोड करून आलेल्या दोन वाहनातून अनुक्रमे ५० आणि ६० क्विंटल तर ९ जुलै रोजी आलेल्या मालट्रकमधून ५० क्विंटल आणि २२ ऑक्टोबर २०१८ रोजी आलेल्या मालट्रकमधील १७० क्विंटल अशी सुमारे ११ लाख ४३ हजार रूपये किमतीची साखर संशयिताच्या गोडावून मध्ये उतरविण्यात आली होती. हा माल उतरवितांना लोढया यांनी बिलाची पावती न दिल्याने ही घटना घडली. पावती न दिल्याची संधी साधत संशयिताने आपल्या गोडावून मध्ये उतरविलेल्या मालाची विक्री करूनही पैसे अदा केले नाही. कालांतराने लोढया यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयिताने माझ्या नादी लागू नको नाही तर वाईट परिणाम होतील अशी धमकी देत पैसे देण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.