नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेम्पो चालक वसूलीसाठी दुकानात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी टेम्पोच्या खिडकीत हात घालून बॅग लंपास केली. या बॅगेत ४० हजाराची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघूनंदन श्रीकांत गोसावी (रा.आकाशवाणी टावर मागे,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोसावी किरकोळ आणि घावूक व्यावसायीकांना आपल्या मारूती कॅरी टेम्पोच्या (एमएच१५ एफव्ही २३०४) माध्यमातून माल पुरविण्याचे काम करतात. गेल्या रविवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास ते माल लोड करून गंगापूर शिवारातील मोतीवाला कॉलेज भागात डिलेवरीसाठी गेले असता ही घटना घडली. डॉन ब्रेकर शाळा परिसरातील कृष्णा ट्रेंडर्स या दुकानाबाहेर टेंडर उभा करून ते माल पोहचविण्याचे काम करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या उघड्या खिडकीत हात घालून गिअरला अडकविलेली हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत वसूलीची ४० हजाराची रोकड आणि महत्वाचे कागदपत्र असलेले पाकिट असा एैवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड करीत आहेत.