नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात भरधाव कार झाडावर आदळल्याने २१ वर्षीय तरूण ठार झाला. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृताच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य संजय विसावे (रा.गोविंदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद पगारे (रा.टागोरनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कारचालक चैतन्य विसावे व आदित्य देविदास पगारे (रा.आशिर्वाद रेसि.आरटीओ कॉलनी,बोधलेनगर पुणारोड) हे दोघे मित्र मंगळवारी (दि.२२) रात्री एमएच १५ एएक्स ०११४ या कारमधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. महात्मानगर येथून एबीबी सर्कलच्या दिशने दोघे मित्र जात असतांना जेहान सर्कल येथील आशियाना बंगल्यासमोर भरधाव कारवरिल चालकाचे आरल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली होती. या अपघातात चालकाशेजारी बसलेल्या पगारे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना मध्यरात्री डॉ.सनी खुने यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत काका प्रमोद पगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.