नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृध्द महिलेची फ्लॅट खरेदी विक्रीच्या व्यवहारात आठ लाख रूपयांची फसवणूक करणा-या तीन जणांविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र घोडेराव, आशा घोडेराव (रा.दोघे शरणपूररोड) व अमोल वाघ (रा.शिवाजीनगर जेलरोड) अशी वृध्देस फसवणूक करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमिला फ्रान्सिस तिमोथी (६७ रा.जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तिमोथी यांनी सन.२०१५ मध्ये घोडेराव यांच्या फ्लॅटचा व्यवहार केला होता. यापोटी त्यांना साडे सात लाख रूपये अदा करण्यात आले होते. या व्यवहारात खरेदीखतानंतरही संशयितांनी फ्लॅटचा ताबा न देता वृध्देच्या रकमेचा अपहार केला. याच काळात वाघ याने वृध्देकडून ६० हजार रूपये घेत सदर मालमत्तेबाबत त्याच्या नावे जनरल मुख्त्यारपत्र लिहून घेतले. त्यानंतर तिघांनी फसवणुकीच्या उद्देशाने विश्वासघात करीत फ्लॅटचा बेकायदा ताबा घेतला. वृध्दा फ्लॅटचा ताबा मागण्यासाठी गेली असता तिघांनी तिला व पतीला बघून घेण्याची धमकी दिल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.