नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका ते जत्रा हॉटेल लिंकरोड भागात कुत्रा अडवा गेल्याने दुचाकी घसरून पडलेल्या मायलेकींपैकी दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. दिव्यांश्री मनोज घुमरे (रा.प्रज्ञा सोसा.कोणार्क नगर,जत्रा हॉटेल) असे मृत बालिकेचे नाव आहे. दिव्यांश्री मंगळवारी (दि.२९) आई दिपाली घुमरेयांच्या सोबत नांदूरनाका भागात गेली होती. दोघी मायलेकी आपल्या दुचाकीवर घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. नांदूरनाक्याकडून त्या जत्रा हॉटेल लिंकरोडने प्रवास करीत असतांना बांबूज हॉटेल समोर अचानक दुचाकीस कुत्रा आडवा गेला. या घटनेत दिपाली घुमरे यांनी अचानक ब्रेक लावल्याने ही दुर्घटना घडली. भरधाव दुचाकी घसरल्याने मायलेकी पडल्या होत्या. या घटनेत दिव्यांश्री हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला मामा ज्ञानेश्वर तागटे यांनी तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. दिपाली तातर यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.