नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात घरात कुणी नसल्याची संधी साधत एका ७० वर्षीय वृध्दाने मतिमंद युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित वृध्दास अटक करण्यात आली आहे. मधुकर महादू सुर्यवंशी (रा.बिडी कामगारनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बिडी कामगार नगर येथील पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ३० वर्षीय पीडिता मतिमंद आहे. रविवारी (दि.२७) पीडिता घरात एकटी असतांना परिसरातील संशयिताने तिचे घर गाठून हे कृत्य केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने पीडितेस विवस्त्र करून विनयभंग केले. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित वृध्दास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.