नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रासबिहारी लिंक रोड भागात पूर्ववैमनस्यातून एकाने शेजारी राहणा-या महिलेस शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संशयिताने महिलेने लावलेल्या फुलझाडांच्या कुंड्या तिच्या दारावर फेकत व जीवे मारण्याची धमकी देत हे कृत्य केले आहे. मंदार ठाकरे (रा.शिवनगर) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार पीडिता व संशयित एकमेकांचे शेजारी असून दोन्ही कुटुंबियात नेहमी किरकोळ वाद होतात. सोमवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास संशयिताची पत्नी व पीडिता यांच्यात वाद झाला होता. या घटनेची माहिती पत्नीने आपल्या पतीस कळविल्याने ही घटना घडली. संशयिताने महिलेचे घर गाठून शिवीगाळ केली. यावेळी संशयिताने फुलझाड्यांच्या कुंड्या महिलेच्या दारावर फेकल्याने महिलेने त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.