नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदापात्रात गेल्या चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय युवतीचा मृतदेह मिळून आला आहे. कावेरी भाऊसाहेब जाधव (१६) असे मृतदेह मिळून आलेल्या युवतीचे नाव आहे. कावेरी ही चांदवड तालुक्यातील शिरूर येथे राहणारी असून ती नाशिकला सावरकर नगर भागात राहणा-या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. कावेरीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबतच्या चर्चेस उधाण आले आहे. गुरूवारी (दि.२४) ती आसाराम बापू आश्रमात जावून येते असे सांगून घराबाहेर पडली होती. उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेत पोलिस ठाणे गाठले होते. ती बेपत्ता असल्याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. चार दिवसानंतर रविवारी सायंकाळी तिचा मृतहेत गोदाघाटावरील रामकुंड भागातील कटारीया ब्रिजजवळ पाण्यात तरंगतांना आढळून आला. अग्निशमनदल आणि जीव रक्षकांच्या मदतीने तिला पाण्याबाहेर काढले असता तिची ओळख पटली. याबाबत प्रसाद जाधव (रा.सावरकरनगर) यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल कासर्ले करीत आहेत.