नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड भागात व देवळाली गावात गुंडांनी हैदोस घालत दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला. टोळक्याने धारदार शस्त्र हवेत फिरवित हा हल्ला केल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. या टोळक्याने नाशिकरोड येथील एका व्यावसायीकावर हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर याच टोळक्याने देवळालीगावातील एका घरावर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. या घटनेने नाशिकरोड भागातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या टोळक्याविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयुर जानराव, तुषार जाधव, कमलेश जानराव, रोहित नवगिरे, दिनेश खरे व मोगल दाणी अशी संशयित हल्लेखोर टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल गणपत गोसावी (रा.धनगर गल्ली,देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोसावी यांचा टिळकपथ रोडवरील हॉटेल ग्रेट मराठा समोर वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी गोसावी आपल्या दुकानावर व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. गोसावी व त्यांचे कामगार नेहमी प्रमाणे दुकानात काम करीत असतांना संशयित टोळक्याने दुकान गाठून गोसावी यांचे शालक तेजस गिरी याच्याशी झालेल्या वादाची कुरापत काढली. यावेळी संतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत गोसावी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी टोळक्याने हवेत धारदार शस्त्र फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. यानंतर टोळक्याने आपला मोर्चा देवळाली गावातील बाबू गेणू रोड भागात वळवून वरची गल्लीत राडा केला. बाळू लक्ष्मण खेलुकर यांनी याप्रकरणी तकार दाखल केली आहे. या टोळक्याने पुतण्या संदेश याच्या समवेत झालेल्या वादातून एमएच ४३ टी २३४५ या चारचाकीतून येत घरावर दगडफेक केल्याचे म्हटले आहे. कोयते व तलवारी घेवून आलेल्या संतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत हा हल्ला केला. तसेच परिसरात दहशत निर्माण होईल अशी कृती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केली. अधिक तपास उपनिरीक्षक शेख आणि सहाय्यक निरीक्षक करीत पोबारा केला. या घटनेत गोसावी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान ही घटना नाशिकरोड भागात वा-यासारखी पसरल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.