नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहवासनगर भागात बोलण्यास टाळाटाळ केल्याने एका सराईताने घरात घुसून महिलेचा विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना घडली. संशयित पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. शैलेष आत्माराम पवार (३१ रा.म्हाडा वसाहत,सहवासनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकाच भागातील रहिवासी असून शुक्रवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास महिला आपल्या पाळीव कुत्र्यास फिरवीत असतांना संशयिताने तिला गाठले. यावेळी त्याने जवळीक साधण्याच्या हेतूने महिलेस तुमचा कुत्रा माझ्यावर भुंकतो असे म्हणत बोलण्यात गुंतविण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत थेट आपले घर गाठले. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने हातात काठी उचलून शिवीगाळ करीत महिलेच्या घरात प्रवेश केला. थांब तुझ्याकडे बघतोच असे म्हणून मुलीसमोर महिलेचा विनयभंग करीत त्याने महिलेस मारहाण काठीने मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.