नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची आता खैर नाही. कारण, नवनियुक्त पोलिस अधिक्षक शहाजी उमप हे आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी अवैध धंद्यांची माहिती मिळविण्यासाठी तातडीने हेल्पाईन क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी ग्रामीण पोलिस दलाच्या हेल्पलाईन क्रमांक २५६३६३ आणि २५६२६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक उमप यांनी केले आहे.
दोन ठिकाणी मोठी कारवाई
जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द ग्रामिण पोलिसांनी दोन कारवाई केल्या आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर येथे शुक्रवारी गावठी दारूचा अड्डा उध्वस्त करुन एकास गजाआड करुन जायखेडा पोलिसांनी सुमारे एक लाख सात हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर दुस-या कारवाईत कळवण ते हतगड मार्गावर सापळा लावून बेकायदा गुटखा वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईत वाहनचालकास बेड्या ठोकत सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकासह गुजरातच्या दोघा वितरकांवर अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायखेडा शिवारात अड्डा उद्धवस्त
पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या आगमनातच पंधरा दिवसांचा अल्टीमेट देत अवैध धंदे बंद करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार स्थानिक पोलिस कामाला लागले आहे. जायखेडा पोलिसांनी मुल्हेर शिवारात सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा हुडकून काढत हातभट्या उध्वस्त केल्या. याप्रकरणी संदिप उखा बागुल (२३ रा.मुल्हेर ता.सटाणा) यास अटक करण्यात आली असून त्याच्या त्याब्यातून रसायन,लोखंडी व प्लॅस्टीक बॅरल तसेच तयार गावठी दारू असा सुमारे १ लाख ७ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गुटख्याची विक्री
दुसरी कारवाई अभोणा – हतगड मार्गावर करण्यात आली. या मार्गावरून गुटख्याची राजरोस वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता वाहन तपासणीत राहूल बाळू उगले (रा.खेडगाव ता.दिंडोरी) हा ओम्नी कार चालक पोलिसांच्या हाती लागला. कारमध्ये राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा आढळून आला. या कारवाईत वाहनासह मुद्देमाल असा सुमारे १ लाख ६४ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस तपासात संशयिताने हा साठा गुजरात राज्यातील वितरक कय्यमु पांजवाणी (रा.चिखली,गुजरात) व अशोक पगार (रा.नवागाव,सापूतारा) यांच्याकडून खरेदी केल्याचे पुढे आले असून याप्रकरणी आभोणा पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करम्यात आला आहे.