नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहतीसह इंदिरानगर भागात दहशत निर्माण करणा-या उध्दव उर्फ टकल्या अशोक राजगिरे (२० रा.म्हाडा घरकुल योजना चुंचाळे) यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. हद्दपारीची कारवाई करूनही त्याने गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
राजगिरे याच्याविरूध्द अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात खून, अवैध शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे,इच्छापूर्वक दुखापत करणे,जबरी चोरी,घरफोडी,विनयभंग, मनाई आदेशाचे उलंघन,हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आदी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. संशयिताची औद्योगीक वसाहतीसह इंदिरानगर भागात असलेली दहशत मोडीत काढण्यासाठी सन.२०२१ मध्ये परिमंडळ २ चे उपायुक्तांच्या आदेशान्वये त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. परंतू तडिपारी काळातही त्याने शहरात वास्तव्य करीत गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या तसेच जनजिवन विस्कळीत केले. यामुळे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी एम.पी.डी.ए.कायद्यान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केली असून, यापूढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.